नवी मुंबई : तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडवर प्रस्तावित वेस्ट-टू-एनर्जी प्रोजेक्टविरोधात शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश कुलकर्णी यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. “या प्रोजेक्टच्या नावाखाली दलाली करणाऱ्यांची दाल आम्ही गलू देणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.
नागरिकांच्या जीवाशी खेळ होऊ देणार नाही
सुरेश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, या प्रोजेक्टमुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. “कितीही दबाव किंवा धमक्या आल्या तरी स्थानिकांच्या जीवाशी खेळ होऊ देणार नाही. गरज पडल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा काढू,” असा इशारा त्यांनी दिला.सुरेश कुलकर्णी यांनी सांगितले की, नवी मुंबई महानगरपालिकेकडून तुर्भे स्टोअर डम्पिंग ग्राउंडवर प्रस्तावित CBG आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रोजेक्टमुळे परिसरात प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
SRA प्रकल्पांवरही परिणाम
या प्रोजेक्टमुळे झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) योजनांवरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या भविष्यावर संकट निर्माण होईल, असेही त्यांनी नमूद केले.
नागरिकांना एकजुटीचे आवाहन
बैठकीत उपस्थित नागरिकांनीही या प्रोजेक्टविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. “प्रशासनाने हा प्रोजेक्ट जबरदस्तीने राबवण्याचा प्रयत्न केला, तर तुर्भेतील नागरिक रस्त्यावर उतरतील,” असा स्पष्ट संदेश देण्यात आला.
विरोधकांकडून कटकारस्थानाचा आरोप
या दरम्यान सुरेश कुलकर्णी यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “प्रोजेक्टचा विरोध केल्यामुळे काही विरोधक मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकेच नव्हे तर माझ्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र मी घाबरणार नाही; नागरिकांसाठी लढत राहीन.”या बैठकीला नगरसेविका सौ. अबोलीताई महेश कुलकर्णी, सविताताई देविदास लगाडे, सविता ताई सांगले, माजी नगरसेविका संगीताताई वास्के, मुद्रिका गवळी, जेष्ठ समाजसेवक रामचंद्र सांगळे, देविदास लगाडे, वसंत वास्के, जेष्ठ समाजसेविका शारदाताई सुळस्कर, अॅड. गुरु सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
