महापेतील A-833 आणि A-834 प्रकल्पांसाठी 105 CMD पाणी मागणी; 180 MW क्षमतेच्या डेटा सेंटरमुळे वीजपुरवठ्याचाही प्रश्न
शीतल मुकुंद वाघमारे
नवी मुंबई | नवी मुंबईत वेगाने वाढणाऱ्या डेटा सेंटर प्रकल्पांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर भविष्यात किती ताण येणार, याबाबत आता सवाल उपस्थित होत आहेत. TTC MIDC, महापे येथील Plot A-833 आणि A-834 या प्रस्तावित प्रकल्पांच्या उपलब्ध कागदपत्रांमध्ये नमूद केलेली पाणी आणि वीज संबंधित माहिती चर्चेचा विषय ठरत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, या दोन्ही भूखंडांचे एकत्रित क्षेत्रफळ सुमारे 2,14,000 चौ.मी. आहे. A-833 प्रकल्पासाठी 50 CMD, तर A-834 प्रकल्पासाठी 55 CMD पाणी मागणी नमूद करण्यात आली आहे. म्हणजेच दोन्ही प्रकल्पांची एकत्रित पाणी मागणी 105 CMD, अर्थात दररोज सुमारे 1.05 लाख लिटर इतकी असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद आहे. ही पेपर वर दिलेली आकडेवारी असून अंदाजे पाण्याची मागणी यापेक्षा काही पटीने जास्त असण्याची शक्यता आहे. 
नागरिकांच्या पाण्याचा आणि उद्योगांच्या पाण्याचा समतोल कसा साधणार?
नवी मुंबईची लोकसंख्या वाढत असताना निवासी भाग, व्यावसायिक आस्थापना, औद्योगिक प्रकल्प आणि नव्या डेटा सेंटरमुळे पाण्याची मागणीही वाढणार आहे. त्यामुळे केवळ सध्याचा जलसाठा उपलब्ध आहे की नाही, यापेक्षा पुढील 10 ते 20 वर्षांची एकूण पाणी गरज आणि उपलब्धता यांचे दीर्घकालीन नियोजन झाले आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.
2026 मध्ये Morbe जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर NMMC ने 10 टक्के पाणी कपात लागू केली होती. सप्टेंबरमध्ये ही कपात तात्पुरती स्थगित करण्यात आली. 16 सप्टेंबर 2026 रोजी Morbe Dam मधील उपयुक्त जलसाठा 75 टक्के असल्याची माहिती NMMC कडून देण्यात आली होती.
मात्र आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पाणी वापरणारे प्रकल्प वाढल्यास शहराच्या जलव्यवस्थेवर त्याचा परिणाम काय होईल, याचे उत्तर नागरिकांना अपेक्षित आहे.
180 MW क्षमतेमुळे वीजेचाही मोठा सवाल
डेटा सेंटर प्रकल्पांसाठी 24 तास अखंड वीजपुरवठा आवश्यक असतो. A-834 प्रकल्पाच्या उपलब्ध माहितीनुसार त्याची Data Centre capacity 180 MW अशी नमूद करण्यात आली आहे.
त्यामुळे प्रश्न केवळ पाण्यापुरता मर्यादित राहत नाही. या क्षमतेच्या प्रकल्पासाठी आवश्यक वीजपुरवठा, वितरण यंत्रणेची क्षमता, बॅकअप व्यवस्था आणि भविष्यातील वाढती औद्योगिक व नागरी वीज मागणी यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे का, याबाबतही स्पष्टता आवश्यक आहे.
NMMC आणि MIDC समोर थेट सवाल
A-833 आणि A-834 साठी नमूद 105 CMD पाणी मागणीचा नवी मुंबईच्या जलव्यवस्थेवर किती परिणाम होणार?
A-834 साठी नमूद 180 MW क्षमतेचा वीज यंत्रणेवर किती अतिरिक्त भार पडणार?
नवी मुंबईची पुढील 10 ते 20 वर्षांची पाणी आणि वीज क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र Capacity Assessment करण्यात आले आहे का?
या प्रकल्पांचा शहराच्या पायाभूत सुविधांवरील संभाव्य परिणाम सार्वजनिक करण्यात आला आहे का?
डेटा सेंटर आणि औद्योगिक विकासाला परवानगी देताना शहराच्या नागरिकांच्या मूलभूत गरजांचे दीर्घकालीन नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे NMMC, MIDC आणि संबंधित वीज यंत्रणेने पाणी व वीज क्षमतेबाबतची अधिकृत आकडेवारी नागरिकांसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.नवी मुंबईचा विकास व्हावा; मात्र या विकासाची किंमत भविष्यात नागरिकांच्या पाणी आणि वीज सुरक्षेला मोजावी लागू नये, यासाठी पारदर्शक नियोजनाची गरज आहे.हा प्रकल्प रद्द करून छोट्या GREEN category Engineering तसेच Food कॅटेगरी उद्योजकांना देण्यात यावा ज्यामुळे Navimumbai मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल असे मत आहे.
