वीज मीटर पुन्हा जोडण्यासाठी मागितली होती ₹20 हजारांची लाच; तडजोडीनंतर ₹18 हजार स्वीकारताना ACBची कारवाई
नवी मुंबई/उरण : वीज मीटर पुन्हा जोडणी करून देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त ₹20 हजारांची लाच मागून तडजोडीनंतर ₹18 हजार स्वीकारणाऱ्या महावितरणच्या वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई 9 सप्टेंबर रोजी उरण परिसरात करण्यात आली.
आरोपी रामेश्वर निवृत्ती घनमोडे, वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन), वर्ग-3, महावितरण कार्यालय, बोकडविरा, उरण, असे अटक करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे.
ACBकडे 2 सप्टेंबर 2026 रोजी एका 45 वर्षीय वेब्रिज व्यावसायिकाने तक्रार केली होती. तक्रारदाराच्या शेजारी राहणाऱ्या आनंदीबाई सदाशिव ठाकूर यांच्या कॅन्टीन व पार्किंग व्यवसायाचा वीजपुरवठा वीजबिल थकित असल्याने खंडित करण्यात आला होता. त्यानंतर वीजबिल भरल्यानंतर मीटर पुन्हा बसविण्यासाठी तक्रारदाराला अधिकारपत्र देण्यात आले होते.
मीटरची पुन्हा जोडणी करून देण्यासाठी तक्रारदाराने वायरमन रामेश्वर घनमोडे यांची भेट घेतली. यावेळी शासकीय शुल्काव्यतिरिक्त ₹20 हजारांची लाच मागण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.
तक्रारीची पडताळणी 3 सप्टेंबर रोजी करण्यात आली. त्यावेळी घनमोडे यांनी ₹20 हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर त्यांनी ₹18 हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी ACBने सापळा रचला. उरण येथील विर्गो लॉजिस्टिकच्या मेनगेटसमोरील रस्त्यावर तक्रारदाराच्या किया सोनेट कारमध्ये ₹18 हजारांची लाच स्वीकारताना घनमोडे यांना सायंकाळी 6.43 वाजता रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी उरण पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीला ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक धर्मराज तुकाराम सोनके यांनी केले. पर्यवेक्षण अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांनी केले.
लाच मागितल्यास ACBशी संपर्क साधण्याचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचारासंदर्भात माहिती किंवा लाच मागितल्यास तातडीने ACBशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नवी मुंबई ACB कार्यालयाचा व्हॉट्सॲप क्रमांक 99203 51064 असून टोल फ्री क्रमांक 1064 आहे. कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 022-27833344 असा आहे.
