शीतल वाघमारे
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ आणि कांदा-बटाटा मार्केटमध्ये विना अनुमती झाडांची छाटणी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच यासंदर्भात एपीएमसी पोलीस ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
तुर्भे - वाशी लिंक मार्गावर कांदा-बटाटा मार्केट परिसरात आठपेक्षा अधिक झाडांची रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात छाटणी करण्यात आली आहे. तसेच एपीएमसी सिग्नल जवळ फळ बाजारात देखील काही झाडांची छाटणी करण्यात आली आहे. झाडांची छाटणी करण्याचे नियम पायदळी तुडवत ही छाटणी करण्यात आली आहे. नियमानुसार झाडाचा शेंडा कधीही छाटू नये असे आहे; परंतु झाड उंचावर वाढत असल्याने या झाडांचा शेंडाच कापण्यात आला आहे. तसेच चारही बाजूंनी काही झाडे पूर्णपणे बोडकी करण्यात आली आहेत. याप्रकरणी समाज माध्यमांमध्ये व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर एपीएमसी मध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात बाजार समितीच्या माध्यमातून विनाअनुमती बाजारआवरात प्रवेश करून झाडांची बेकायदेशीर छाटणी करण्यात आल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे देखील बाजार समितीने कळवले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची छाटणी होत असताना दोन्ही बाजारपेठे मधील सुरक्षारक्षकांना याची भनक लागू नये, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांची ही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजार समितीतील दुसऱ्या माळ्यावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा या वृक्ष छाटणी करणाऱ्यांना वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा दुसऱ्या मळ्यावरील अधिकारी कोण अशी चर्चा बाजार समिती मध्ये रंगली आहे.
